कुसुमाग्रज
"सर, ओळखलं का??" कोणत्याही हाडाच्या मराठी मिडीयमवाल्याला, हे वाक्य कानांवर पडलं की दुसरं काहीही सुचायच्या आधी कुसुमाग्रज आठवतात. माझंही तेच झालं. बाजूला मान वळवून पाहिलं तर, कपडेही कर्दमलेले आणि केसात पाणीसुद्धा. मनात म्हटलं, "वाह, सगळंच जुळतय." पार्ल्याला गरवारे सिग्नलपासून पुढे चकाला सिगारेट फॅक्टरीपर्यन्तच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या फुटपाथवर अनेक गरीब, बेघर कुटुंबांचे संसार मांडलेले असतात. वर्षभर ही कुटुंब तिथेच असतात. अपवाद पावसाळ्याचे चार महिने. त्या चार महिन्यात या सगळ्या कबिल्याला गरवारे सिग्नलचा उड्डाणपूल आपल्या पंखांखाली घेतो. या वर्षी नवीन ऋतू हिवसाळा सुरू असल्याने जानेवारी उगवला तरीही यातली काही कुटुंबं अजूनसुद्धा तिथेच ठाण मांडून आहेत. साधारण दहा बारा म्हाताऱ्या, पंधरा एक मध्यमवयीन स्त्रीपुरुष, दहापंधरा तरुण-तरुणी, तितकीच लहान मुलं आणि तितकीच तान्ही बाळं, अशी एक अजब डेमोग्राफी इथे पहायला मिळते. या गर्दीतले चेहरेही कायम सारखे नसतात. दर काही दिवसांनी काही चेहरे दिसेनासे होतात आणि काही नवीन चेहऱ्यांची भर त्यात पडत असते. शिफ्ट्स मधे काम करत असल्याने आणि...